अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रंप म्हणतात, ‘आता मी सर्वांचं चुंबन घेऊ शकतो’

कोव्हिड-19 ची लागण झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारांसाठी डोनाल्ड ट्रंप यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकादिवसापूर्वी डॉक्टरांनी, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

त्यांनी स्वत: कोव्हिड-19 वर मात कशी केली याबाबत सांगताना ते म्हणाले, “मी इम्युन झालो आहे. मला शक्ती मिळाल्यासारखं वाटतंय. मी सर्वांना किस करेन. पुरुषांना आणि सुंदर महिलांनासुद्धा.”

फ्लोरिडामधल्या सॅनफोर्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पुढील चार दिवस ट्रंप प्रचार करणार आहेत.

3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ट्रंप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन लोकांपर्यंत पोहोचून मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

मतदानपूर्व चाचणीनुसार जो बायडन हे ट्रंप यांच्यापेक्षा 10 अंकांनी पुढे आहेत. रिअर क्लिअर पॉलिटिक्सने गोळा गेलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये बायडन यांची आघाडी खूप कमी आहे. उदाहरणार्थ, फ्लोरिडासारख्या राज्यामध्ये बायडन फक्त 3.7 अंकानी आघाडीवर आहेत.

फ्लोरिडाला “सनशाईन स्टेट” म्हणून ओळखलं जातं. या राज्यात “व्हाइट हाऊस” ची निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 270 इलोक्टोरल कॉलेज वोट मिळवणं निर्णायक ठरणार आहे. जी बेलेट काउंट पद्धतीने निश्चित केली जात नाहीत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 11 दिवसांपूर्वी कोव्हिड-19च्या संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

पण, रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी डॉक्टरांनी, ट्रंप यांच्याकडून इतरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका नसल्याचं स्पष्ट केलं. तर, सोमवारी डॉक्टरांनी ट्रंप यांच्या लागोपाट दोन दिवस करण्यात आलेल्या टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती दिली. पण, त्यांनी तारखा सांगितल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *