‘निसर्गा’ कोकणावर का कोपलास? | Nisarga cyclone damage kokan

M Marathi
Read Time:15 Minute, 26 Second

[ad_1]

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : हुंदका दाबत, अश्रू पुसत पडलेलं घर सावरणारे थरथरणारे हात. पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या, जपलेल्या बागा जमीनदोस्त झालेल्या पाहून शुद्ध हरपत होती. वाडवडिलांची आठवण असलेले घर भुईसपाट झाले होते. किती आठवणी होत्या त्या घरात आणि वाडीत. पण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं. समुद्राचा वाटणारा हेवा आज संतापात परिवर्तित झाला होता. सारं काही संपल्यासारखं सारं गाव भकास झालं होतं. डबडबलेल्या डोळ्यांमध्ये एकच प्रश्न उरला आहे, सारं संपलं का? पुन्हा कसं उभं राहायचं? यातून सावरावं कसं? आता कसं जगायचं? निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर कोकण किनारपट्टीला खेटून वसलेल्या गावांमधलं हे चित्र; मन सुन्न करून जातं.

कधीकाळी याच गावांमधून फिरण्याचा, बागडण्याचा, खेळण्याचा योग आला होता. सवंगड्यांच्या संगतीनं समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय रोवून उभं राहत अथांग अशा सागराकडे एकटक पाहण्यात वेगळीच मजा होती. सुरूच्या बनात फेरफटका मारत अनेकदा गप्पांचे फड रंगले होते. लाल मातीच्या कौलारू घरांमध्ये, नारळी-फोपळीच्या बागेतल्या अनेक आठवणी एखाद्या कुपीत जपाव्यात तशा जपल्या होत्या. त्या साऱ्या नजरेसमोरून जात असताना आता अश्रूंना आवरणे कठीण होते. 

निसर्ग चक्रीवादळानं आमचं सारं हिरावून नेलं होतं. माझं कोकण बोडकं झालं होतं. तसं पाहिलं तर कोकणात जन्म झाल्याचा एक वेगळाच माज होता. असणारच! कारण, या निसर्गानं खूप काही देत कणखरपणा शिकवला होता. आव्हानांना झेलत पुढे जाण्याची जिद्द दिली होती. पण, आजचं चित्र पाहता सारं संपलं होतं. मन कावरंबावरं झालं होतं. अनेक आठवणी डोळ्यांसमोर सरत होत्या आणि डोळ्यांच्या पापण्या ओल्या करत होत्या. किती भरभरून दिलं होतं या निसर्गानं आणि ओरबडूनही नेलं. नेहमी हेवा वाटणारा समुद्र आणि त्याची गाज आज नकोशी वाटत होती. त्याला ललकारून ललकारून विचारावलं वाटत होतं, तू का झालास इतका निर्दयी? काय चुकलं आमचं की सारं नेलंस? अरे तुझा अभिमान बाळगला ते चुकलं की, तुला आपलं मानलं ते चुकलं? जीवापाड प्रेम करत तुला जपलं, ही तर चुक नाही ना आमची? 

सकाळ, संध्याकाळ तुझी साद आल्यानंतर तुला भेटण्याकरता आतूर असायचो आम्ही. पण, आता? तुझा राग येतो. कारण, तू आज आमचं सारं हिरावून घेतलंस रे. पाव्हणे-रावळे आल्यानंतर तुझी भेट न चुकता घ्यायचे. तुझं कौतुक देखील करायचे, त्याचीच शिक्षा दिलीस का? तुझ्या फेसाळत्या लाटांमधून उभं राहत मावळता सूर्य पाहवा, तो तुला आपल्यात सामावून तर घेणार नाही ना? याची भीती वाटायची आणि मन चर्रर्र व्हायचं. पण, सकाळी तुझं शांत रूप पाहता पुन्हा एकदा चेहऱ्यावर हास्य फुलायचं? आणि याचीच परत फेड म्हणून तू इतका निष्ठूर आणि निर्दयी झालास? 

पिढ्यान पिढ्या जपलेल्या नारळी, फोपळी, आंबा, काजूच्या बागा आज भुईसपाट झाल्यात. अनेक आठवणींनी भरलेले वडिलोपार्जित घर आज जमीनदोस्त झालंय. निसर्ग चक्रीवादळ आलं आणि सारं हिरावून नेलं. ज्या सौंदर्याचा आम्हाला गर्व होता, त्याच सौंदर्याला निसर्गाचीच नजर लागली. पुन्हा नव्यानं उभारी घेण्यासाठी सारी धडपड सुरू झालीय. आम्हाला माहितेय आम्ही २० वर्षे मागे आलोय. पण, आम्ही पुन्हा उभे राहू. नव्या उमेदीनं आणि जिद्दीनं. 

मोडून पडलं ‘कोकण’ तरी…

कोसळलेल्या घरात असलेल्या आठवणी आता दाटून येतात. लेकराप्रमाणे जपलेल्या बागा, ताठ मानेनं उभ्या असलेलं पाहताना ऊर अभिमानानं भरून यायचा. पण, त्या देखील आज पार झोपल्यात, कायमच्या! यावर देखील मात करू. कारण, संकटांना मात करत पुढे जाण्याचं बाळकडू आम्ही कोकणी माणसं जन्मताच घेऊन येतो. निसर्गाची देण आहे ती आम्हाला. संकटांना आव्हान देत पुढे जाण्याचं बाळकडू आम्हाला निसर्गानंच दिलंय. हे दिवस देखील सरतील. आम्ही पुन्हा उभारी घेऊ. नव्या जोमानं आणि जिद्दीनं सारं उभारू आणि त्याच समुद्राच्या वाळूत पाय रोवून त्याला ललकारू!!!

निसर्ग चक्रीवादळ येणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यापासून झी २४ तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर दापोलीत होते. निसर्गाचा रुद्रावतार त्यांनी अनुभवला. लहानपणापासून पाहिलेल्या कोकणच्या किनाऱ्यावरचं सौंदर्य, समृद्धी काही तासांत उद्ध्वस्त होताना पाहिली. त्यानंतर विस्कटलेले गाव, संसार पाहून त्या वेदना वार्तांकनातून प्रेक्षकांसमोर, सरकारसमोर मांडल्या. हे करत असताना आलेल्या अनुभवातून कोकणच्या मातीतील माणसांच्या वेदना आणि भावनांना या लेखातून वाट‌ मोकळी करून दिली आहे.[ad_2]
Source link

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Oppo Find X2 सीरीज भारतात लॉन्च होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

[ad_1] नवी दिल्ली : Oppo Find X2 सीरीज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी या सीरीजचे दोन स्मार्टफोन Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro लॉन्च करणार आहे. भारताआधी हे दोन्ही स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. 17 जून रोजी दुपारी 4 वाजता ओप्पोच्या या दोन्ही सीरीजचं लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लॉन्चिंग […]

You May Like